SAHYADRI HOSPITAL
blog post

पुरूषांमधील वंध्यत्व

By Dr. Supriya Puranik

एखादा पुरूष तंदुरूस्त असेल , आहार-विहार व्यवस्थित असेल तरी वंध्यत्वाची लक्षणे(symptoms of infertility) त्यामध्ये असू शकतात का? खरंतरं बहुतेकशा पुरूषांमध्ये कोणतीही स्पष्ट चिन्हे दिसत नाहीत. संभोग,लिंग ताठणे आणि उत्सर्ग (इजॅक्युलेशन) कुठल्याही अडचणीशिवाय होते. बाहेर आलेले वीर्य आणि त्याचे प्रमाण हे सामान्यच दिसते. मात्र , फक्त वैद्यकीय तपासणी आणि चाचण्या सांगू शकतात की , ती व्यक्ती वंध्यत्वास कारणीभूत आहे की नाही?अनेक अभ्यासांनुसार गेल्या काही वर्षात शुक्राणूंची संख्या(sperm counts), गतिशीलता कमी(motility) व रचनेमध्ये बिघाड झाल्याचे आढळून आले आहे. गुणवत्तेत होणारी ही घट चुकीचा आहार , व्यायामाचा अभाव , अपुरी झोप , ताण,इलेक्ट्रॉनिक उपकरणांचा अतिवापर,तंबाखू,मद्यपान यांसारख्या जीवनशैलीशी निगडित बदलांशी जोडले गेले आहे . धुम्रपान आणि नियमित मद्यपान हे गतिशीलता कमी होणे आणि पुरुषांमधील वंध्यत्वाचे प्रमाण वाढवण्याचे प्रमुख कारणांपैकी एक आहेत . सध्या फक्त शहरीच नाही तर ग्रामीण भागांमध्ये देखील कामकाजाचा तणाव कमी-अधिक प्रमाणात आढळून येतो . म्हणूनच चांगला आहार , हंगामी फळांचा समावेश, नियमित व्यायाम,पुरेशी झोप या सर्व गोष्टी गरजेच्या आहेत.

पुरुषांमधील वंध्यत्वामध्ये शुक्राणूंचा आकार आणि रचना हा एक महत्वाचा घटक आहे. जेव्हा हे असामान्य असते तेव्हा प्रजननक्षमता कमी होऊ शकते आणि स्त्रियांमधील अंडी फलित करण्यामध्ये अडथळे येऊ शकतात.

चुकीच्या जीवनशैलीशिवाय मधुमेहसारखे आजार किंवा पुरूषांनी वीर्य गोठविणे , केमोथेरपी व इम्युनोसप्रेसंटस सारखे उपचार देखील पुरूषांच्या शुक्राणूंची फलन करण्याची क्षमतेमध्ये अडथळा निर्माण करू शकतात.याचा अर्थ अशा सर्व लोकांमध्ये वंध्यत्वाची समस्या असेलच असे नाही.चांगल्या गुणवत्तेच्या गर्भाच्या निर्मितीसाठी शुक्राणूंचे डीएनए (जनुकीय घटक) हे निरोगी असणे गरजेचे आहे. केमोथेरपी उपचार घेणार्या रूग्णांना देखील मार्गदर्शनाची गरज असते. कर्करोगातून बरे होणार्या लोकांची संख्या वाढत असून त्यात अनेक तरूणांचा समावेश आहे. त्यांच्यापुढे त्यांचे पूर्ण आयुष्य समोर असते.त्यामुळे वंध्यत्वाबाबत समुपदेशन गरजेचे आहे.

वंध्यत्वाचे कारण(cause of infertility) समजले तर,त्याचे उपचार अधिक सोपे होतात.महिलांमध्ये जशी लक्षणे दिसून येतात , तशी पुरूषांमध्ये कोणतीही स्पष्ट लक्षणे दिसून येत नाहीत. पुरूषांमध्ये शुक्राणूंची गुणवत्ता त्यांची संख्या , गतिशीलता,रचनावर अवलंबून असते.शुक्राणूंची संख्या व गुणवत्ता कमी असेल तर गर्भधारणेमध्ये समस्या उद्भवू शकतात.

शुक्राणूंची संख्या कमी असण्याची काही कारणे :

पुरूषांमध्ये शुक्राणूंची संख्या कमी होण्याच्या काही कारणांमध्ये वॅरीकोसल्स (अंडकोषच्या वरच्या भागातील रक्तवाहिन्या असामान्यरित्या गोळा होणे),अविकसित अंडकोष ,अंडकोष किंवा प्रोस्टेटमध्ये संसर्ग,अनुवंशिक विकृती आणि हार्मोन्स संदर्भात समस्या यांचा समावेश आहे.कधी कधी शुक्राणू ज्या ठिकाणी जाण्याची आवश्यकता असते,तेथे जाणे ही एक समस्या असते आणि हे वीर्य बाहेर येण्याऐवजी मुत्राशयात मागे येणे (रेट्रोग्रेड इजॅक्युलेशन) यामुळे होऊ शकते.त्याशिवाय पुनरूत्पादक प्रणालीमध्ये अडथळा,वास डेफेरन्स या शुक्राणूंच्या मुख्य नलिकेची अनुपस्थिती किंवा अडथळे तसेच शुक्राणूंविरोधी अँटीबॉडीज उपस्थिती ही देखील कारणे असू शकतात.लैंगिक समस्या असल्यास किंवा प्रयत्न करूनही वर्षभर जोडप्यामध्ये गर्भधारणा होऊ न शकल्यास डॉक्टरांचा त्वरित सल्ला घेणे गरजेचे आहे.

उपचार

पुरूषांमधील वंध्यत्वाच्या उपचार(Treatment for infertility) पध्दतींमध्ये हॉर्मोन्सच्या समस्यांवर औषधे, अँटीऑक्डिेंटसचा वापर,जीवनशैलीतील बदल इत्यादींचा समावेश आहे.उपचाराची पध्दती ही शुक्राणूंच्या संख्येवर आणि जोडीदारांशी संबंधित समस्यांवर अवलंबून असते. ओलिगोस्पर्मिया (oligospermia)या स्थितीत शुक्राणूंची संख्या ही काठावर असते,अजूस्पर्मिया (azoospermia )या स्थितीत शुक्राणूंची संख्या शून्य असते,तर टेराटोस्पर्मिया(Teratospermia) मध्ये शुक्राणूंच्या रचनेमध्ये असामान्यता असते व अस्थेंजोस्पर्मिया मध्ये मेलेले शुक्राणू असतात. अजूस्पर्मियाचे दोन प्रकार असतात.- ऑब्स्ट्रक्टटिव्ह ज्यामध्ये अंतर्गत अडथळ्यांमध्ये शुक्राणू बाहेर येऊ शकत नाहीत आणि दुसरा प्रकार म्हणजे नॉन ऑब्सस्ट्रक्टिव्ह अजूस्पर्मिया.रक्ताच्या चाचणीद्वारे कुठला प्रकार आहे हे समजू शकते.

शुक्राणूंची संख्या आणि गतिशीलतानुसार उपचार सुचवले जातात . जर शुक्राणूंची संख्या थोड्या प्रमाणात कमी असेल तर इंट्रायुटेरिन इनसेमिनेशन (IUI) आणि खूप कमी असेल तर इंट्रा सायटोप्लास्मिक स्पर्म इंजेक्शन (ICSI) अशा अद्ययावत तंत्रज्ञानयुक्त पर्यायांचा सल्ला दिला जाऊ शकतो.

आययुआय(IUI) पध्दतीमध्ये महिलांना बीजांडांची संख्या वाढविण्यासाठी औषधे दिली जातात आणि गर्भाशयात शुक्राणू छोट्या नलिकेद्वारे सोडले जातात.आयसीएसआयमध्ये अंड्यामध्ये सुईच्या माध्यमातून शुक्राणू सोडले जाते व गर्भ बाहेर बनविले जातात.

वंध्यत्व ही कठिण समस्या असली तरी या प्रवासात कुणीही एकटे नाही हे लक्षात ठेवणे गरजेचे आहे. वेळेवर चाचण्या करून योग्य उपचार घेतल्यास आपल्याला आपल्याच शुक्राणूंपासून बाळ मिळू शकते.

Blog Admin

By Dr. Supriya Puranik
(OBGY & Infertility Consultant) at Sahyadri Speciality Hospital Nagar Road, Pune
Contact: 8806252525 Email - ask@sahyadrihospitals.com